पत्रलेखन

*💫घे भरारी च्या राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत मला तृतीय क्रमांक प्राप्त...💫*

                  पत्रलेखन

                               मेल्सीना तुस्कानो,
                               घोसाळी - विरार (w),
                               मुंबई - 401301,
                               दिनांक :- ९/०७/१८


विषय :- कवितेस पत्र              

प्रिय कविता,

खूप दिवस झाले, नाही नाही दिवस नाही तर महिने झाले, मी तुला लिहिलेच नाही, मी तुला लिहिण्यासाठी लेखणी उचललीच नाही, मी तुझ्याशी गप्पा मारल्याच नाहीत.तुला वेळच दिला नाही. अन त्यासाठी सर्वप्रथम मी तुझी माफी मागते, मला माफ कर. पण मी करू तरी काय. तुला माहीतच आहे ना, की मी आता आताच कामाला लागली आहे, ऑफिसचे काम,कॉलेजचे अभ्यास ह्यातून तुला वेळ देणं मला कठीण होत होतं.
संध्याकाळी त्या ट्रेन च्या धक्क्यातून घरी आल्यानंतर खूप थकल्यासारखे वाटायचे, सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत डोक्यात कामाचे विचार असल्यामुळे डोकं दुखायचं, त्यामुळे कधी एकदा जेवून झोपते असं मला व्हायचं. आणि म्हणून तुला हवा तसा वेळ मला देता येत नव्हता. पण खरं सांगू मला माझं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व फक्त तुझ्या मुळेच मिळालं.
तुला 2 वर्षांपूर्वी मी लिहिण्यास सुरवात केली.. आणि तेव्हा पासूनच तू माझ्या मनात घर केलं. मी कधी तुला फक्त कविता म्हणून लिहिलं नाही, तर मी तुला खरं अनुभवलं, तुझ्यात जगू लागली, आणि त्यातून तू माझी एक जवळची मैत्रीण बनली. माझ्या प्रत्येक सुखदुःखात मी तुला सामावून घेतलं. आनंदाच्या वेळी मी माझ्या आनंदी भावना तुझ्या द्वारे लोकांसमोर ठेवल्या. अन दुःखाच्या प्रसंगातही मी माझ्या दुःखी भावना सर्वांसमोर मांडल्या. तुझ्यामुळे मी माझं वेगळं स्थान निर्माण केलं. तूच मला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांची ओळख करून दिली.
तुझी अन माझी ओळख लहानपणापासूनची नव्हती, कोणत्या एका ठरावीक वळणावरही झाली नव्हती.
तुझी माझी ओळख होती अकस्मात झालेली. तू अचानक आली माझ्या आयुष्यात. आणि इतकी जवळची झाली, की माझीच बनून राहिली.
शेवटी एवढंच....
"कविता तूचं माझा ध्यास अन माझा श्वास
माझी एक नवीन ओळख देऊन
वाढवली माझ्यात काव्यांची रास"

*© मेल्सीना तुस्कानो*
*मुंबई*

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.