*गैरसमज अनिंसचा* (चौकट अंधश्रध्दा निर्मुलनाची - 4)

*गैरसमज अनिंसचा* (चौकट अंधश्रध्दा निर्मुलनाची)
----------------------------------------
by - *योगेश रंगनाथ निकम*
औरंगाबाद
Yogeshnikam1303@gmail.com 
10 डिसेंबर 2018

मागील लेखात मी सांगितलेल्या प्रयोगाने ज्यांच्या अंगावर शहारे आले असतील, त्यांनी एका सत्य घटनेवर आधारलेला *अलाईव्ह* हा सुंदर इंग्रजी चित्रपट पाहावा. जिवंतपणाची कुठलीही खूण नसणार्‍या बर्फाळ भागात एका प्रवासी विमानाचा अपघात होतो. विमानातले काही प्रवासी त्या अपघातात मरण पावतात व बरेचसे वाचतात. वाचलेल्यांना प्रवाशांना तिथल्या भयंकर परिस्थितीशी लढा देऊन माणसांच्या जगात परत येण्यासाठी, काही दिवस जिवंत राहणे आवश्यक असते त्यामुळे जिवंत राहण्यासाठी त्यांना आपल्या पोटाची भूक भागवणेसुध्दा आवश्यक ठरते. 'अन्न’ ही मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी मग त्यातले काही प्रवासी अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या मृतदेहाच्या मांसाचे भक्षण करतात. ‘या प्रकारे आपली भूक भागवली जावी’ हे ज्यांच्या बुद्धीला पटत नाही असे प्रवासी अन्नाअभावी मरण पत्कारणे पसंत करतात. त्यातला एक प्रवासी मरता मरता जिवंत असणार्‍यांना सांगते की, ‘मानव देहाच्या मांसाचे भक्षण करणे मला तर काही जमले नाही, परंतू माझ्या शरीराचे मांस खाऊन तुम्ही जिवंत राहावे अशी माझी इच्छा आहे व त्यास मी आनंदाने परवानगी देतो’. या विमान अपघातातून जे पुन्हा आपल्या जगात परत आले त्यांनीच ही कहाणी वर्णन केली आहे.

सांगायचे एवढेच की, ‘अपरीहार्य परिस्थितीत मानव कसा वागेल’ याचा अंदाज बांधता येत नाही. तो ज्या प्रकारे वागला त्याचे समर्थनही करता येत नाही व त्याचे वागणे चूक होते असे म्हणण्याचाही आपल्याला काही अधिकार असत नाही. थोडक्यात, *आपण न्यायाधीशाची भूमिका पार पाडू शकत नाही*. कारण आपण, आपापल्या दिवाणखान्यांमध्ये बसून चहाच्या घोटासोबत फक्त विचार करत असतो.

‘अपरिहार्य परिस्थिती आपल्यासमोर उद्भवली तर आपण स्वत: नेमके कसे वागू?’ याबद्दल आपल्याला विचार करता येईल खरा, पण तो ‘जर तर’ चा विचार असेल. स्वत:ची ‘अशा शक्यता अशक्यतांच्या अपरिहार्य परिस्थितीतून सुटका व्हावी’ म्हणून मानवाने संस्कृती व त्याद्वारे जगण्याची एक विशिष्ट पद्धत निर्माण केली. आपण जी जीवनपद्धती जगत असतो ती क्षणार्धात निर्माण झालेली नसते, त्यामुळे काळाच्या ओघात तिच्यात निर्माण झालेले टाकाऊ घटक काढून टाकण्यासाठी सुद्धा दीर्घकाळ जावा लागतो. आपल्या जीवनपद्धतीत ‘त्याज्य दुर्गुण’ निर्माण झालेले आहेत हे कळण्याइतपत जीवनदृष्टी सर्वसाधारण समाजाला असत नाही. अशी दृष्टी असणारे 'ज्ञानी लोक' समाजप्रवाहातील साचलेपणा दूर करून आपल्या संस्कृतीला काळाबरोबर वाहते ठेवत असतात. या ज्ञानी लोकांना विरोध करणारेही असले तरी ज्ञानी लोक मात्र आपल्या विरोधकांना हीन लेखत नाहीत. कारण, हा विरोध अज्ञानातून आलेला आहे याची त्यांना जाण असते. तसेच हे ज्ञानी लोक ‘काही गोष्टी चुकीच्या आहेत' या कारणाने संपूर्ण जीवनदृष्टी चुकीची ठरवत नाहीत व संपूर्ण संस्कृतीचा पायादेखील भुसभुशीत करत नाहीत.

हे सगळे विवेचन करण्याचे कारण की, *आजच्या हिंदू समाजाची अस्वस्थता* हीच आहे. इंग्रजांच्या आगमनासोबत भारतात आलेला, *पाश्चिमात्य पुढारलेपणाचा दृष्टीकोण व त्याधारे भारतीय संस्कृतीला हीन लेखण्याची मनोवृत्ती* हे घटक विद्यमान हिंदू असंतोषाचे जनक आहेत. हिंदू धर्म व त्यायोगे भारतीय संस्कृतीमधे मध्ययुगात अस्तीत्वात असलेल्या बहुतांश चुकीच्या संकल्पना काळाच्या ओघात कधीच्याच मागे पडल्या आहेत. हिंदू व भारतीय सामाजाने काळाप्रमाणे आपल्यात बदल केले आहेत. असे असतांनाही 'काहीच घडले नाही’ या आविर्भावात समाजातील काही घटक हिंदू धर्मावर अखंडपणे अश्लाघ्य टीकाटिपण्ण्या करून असंतोष पसरवत आहेत.

असंतोष पसरवणारे हे घटक भारतात बऱ्याच शतकांपासून अस्तीत्वात असले तरी, त्यांची मानसिकता लोकांपर्यंत पोहोचण्याला मर्यादा होती. कारण, विचार प्रसिद्ध करण्याचे कालपर्यंतचे महत्वाचे माध्यम असणार्‍या प्रिंटमीडिया व पुस्तकांमध्ये लिहिलेले शेवटी प्रत्यक्ष छापले जात असे. साहजिकच ते प्रसिद्ध करणार्‍याला जबाबदारीची जाणीव व कायद्यांची भीती होती. आजच्या काळातील सोशल मीडियाने मात्र या सर्व मर्यादा जवळपास काढून टाकल्या आहेत. आपले विचार प्रसारित करण्याचे 'मोबाइल' हे अतिशय सोपे साधन उपलब्ध झाल्यापासून लिहिणारे सहज मोकळे व्हायला लागले आहेत. परिणामी, आजच्या काळात लिहिणार्‍यांची व जे काही बरे-वाईट लिहिले जात आहे ते नजरेसमोरून घालवणार्‍या वाचकांची संख्याही अमर्यादित प्रमाणात वाढते आहे. याचा फायदा घेऊन भारतीय समाजव्यवस्था उध्वस्त करू पाहणार्‍या अनेकानेक देशी-विदेशी शक्ति, लिहिणार्‍या डोक्यांना दिशा देण्याचे कार्य करत आहेत. या ‘विघातक शक्तींची कार्य करण्याची पद्धत कशी आहे’ हा समजावून घेण्याचा विषय असून, त्याचे होणारे भयंकर परिणाम रोखण्यासाठी काय करता येईल, हा स्वतंत्र चर्चेचा भाग आहे. पुढच्या विविध लेखांद्वारे आपण या सर्व बाबींवर चर्चा करूच, पण *त्याआधी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे 'अंधश्रध्दा निर्मुलनासाठी हिंदूंच्याच प्रतिकांना का निवडले जाते?' याप्रश्नाचे जे उत्तर डॉ. दाभोलकरांनी आपल्या परीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावर चर्चा करूया.*

या प्रकारचा प्रश्न डॉ. दाभोलकरांना याआधीही विचारला गेला असेल, त्याचे विश्लेषण करताना ते म्हणतात की, “समिती अंधश्रद्धांची जी प्रकरणे लढवते, त्या प्रकरणांतील बहुसंख्य प्रकरणे हिंदूंची असतात, हे खरे आहे. याचे कारण असे आहे की, भारतात 82 टक्के हिंदू धर्मीय लोक आहेत. याचाच अर्थ असा, समितीने लढवलेल्या प्रकरणांतील साधारणपणे 82 टक्के प्रकरणे हिंदूंचीच असणार आणि त्यामुळे ती बहुसंख्येने दिसतात.”

डॉक्टरांचे वरील म्हणणे मला व्यक्तिश: अगदी 100 टक्के मान्य आहे. आता याच सत्यतेचा आधार घेऊन हे ही सिद्ध होते की, जेंव्हा 82 टक्के प्रकरणे हिंदूंची असतील अशावेळी अंनिसच्या कार्यामुळे जे लोक अस्वस्थ होतात, त्यांच्यात जास्तीत जास्त प्रमाण हिंदूंचे असेल व अंनिसला विरोध असणार्‍या इतर धर्मियांचे प्रमाण तितकेसे मोठे असणार नाही. कारण, हा फक्त लोकसंखेच्या टक्केवारीमूळे दिसणारा फरक आहे.

याचा दुसरा अर्थ असा की, इतर धर्मियांच्या श्रद्धा किंवा अंधश्रद्धांचे इतक्याच मोठ्या प्रमाणात व सातत्याने अशाच प्रकारे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्याकडून अंनिसला होणार्‍या (कदाचित अधिक कट्टर) विरोधाची टक्केवारीही तितकीच मोठी असेल. *येथे मुद्दा लक्षात घ्यायचा तो एवढाच की, अंनिसला जे लोक विरोध करतात त्यामध्ये हिंदूंचे प्रमाण जास्त दिसण्याचे कारण हिंदू लोकसंखेची बहुलता एवढेच आहे. त्यामुळे, अनिंसला होणाऱ्या विरोधाची टक्केवारी ही हिंदू धर्माशी निगडित समस्या नसून, हा फक्त तुम्ही ज्यांच्या भावनांशी खेळता आहात, त्या लोकांच्या लोकसंख्येचा प्रश्न आहे.*

आता आपण जरा आणखी गहण विश्लेषणाकडे जाऊया. हिंदूंसमोरचा सर्वात मोठा प्रश्न असा की, "मुळात अनिंसवाले हिंदू समाजाशी निगडीत प्रकरणांवरच मोठ्या प्रमाणात बोट का ठेवतात ? त्यांना इतर धर्मियांच्या अंधश्रध्दा दिसत नाहीत का ?" 

या प्रकारच्या प्रश्नाचे जे उत्तर डॉ. दाभोळकरांनी दिले आहे ते आपण आधी सविस्तरपणे पाहू. या प्रकारच्या प्रश्नासंदर्भात उत्तर देताना डॉक्टर म्हणतात की, 'समाजात आजही एका धर्माच्या अंधश्रध्देबद्दल दुसऱ्या धर्मातील लोकांनी बोललेले चालत नाही. एवढेच नव्हे, तर एका जातीतील अंधश्रध्देबद्दल दुसऱ्यांनी बोलले तरी प्रक्षोभ होतो. समाजात 82% लोक हिंदू आहेत. याचा अर्थ 'अनिंस'मधील कार्यकर्त्यांची किमान तेवढी संख्या हिंदूंची असणार. स्वाभाविकच या हिंदू कार्यकर्त्यांनी मुसलमानांच्या अंधश्रध्दांबद्दल बोलणे ही बाब मुसलमानांना रुचत नाही."

वाचकांनो, *वरील विश्लेषण करताना डॉक्टरांनी एक गंभीर चूक केली आहे*, ती आपण समजून घेतली तर 'हिंदू धर्म व हिंदू मानसिकता समजून न घेण्याचा’ जो घातक परिणाम भारतीय समाजावर मागच्या काही शतकांपासून होत आहे, तो यापुढे होऊ नये म्हणून प्रयत्न करता येतील. *"समाजात 82% लोक हिंदू आहेत. याचा अर्थ 'अनिंस'मधील कार्यकर्त्यांची किमान तेवढी संख्या हिंदूंची असणार" असे समजणे म्हणजे निव्वळ गैरसमज आहे* आणि तो निर्माण होण्याचे कारण म्हणजे, वरील विश्लेषण करताना ‘हिंदू धर्माच्या एका अनोख्या वैशिष्ट्याचा विचार करण्यात आलेला नाही. (येथे हिंदू धर्म या संकल्पनेअंतर्गत ‘भारतात उदयास आलेले सर्व धर्म/ पंथ/ संप्रदाय’ असा अर्थ गृहीत आहे. कारण, या विभिन्न मत-मतांतरच्या लोकांच्या मानसिकतेमध्ये/ आचार-विचारांमध्ये तसेच जीवनपद्धतीमध्ये ‘समरसतेची भारतीय समानता’ आहे.)

अंनिस कार्यकर्त्यांच्या एकूण संख्येमधे हिंदू धर्मीय कार्यकर्त्यांची संख्या 82% एवढी प्रचंड असेलही. परंतू ती तितकी असण्याचे कारण डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे ‘भारतीय लोकसंख्येतील हिंदूंचे जास्त प्रमाण’ एवढेच असल्याचे समजणे म्हणजे अतिशय *गंभीर चूक* आहे आणि हीच चूक आपण सगळे आतापर्यंत धर्मनिरपेक्षता व राष्ट्रवादासारख्या संकल्पना समजावून घेतानासुद्धा करत आलो आहोत. ही चूक ‘भारतीय समाजाकडे पाश्चात्य चश्म्यांतून बघण्याचे प्रशिक्षण मिळाल्याने’ होत आलेली असून, ती दुरुस्त करण्यासाठी आपल्याला ‘स्वत:कडे स्वत:च्या नजरेतून बघणे’ पुन्हा एकदा शिकावे लागेल.

*कोण आहोत आपण हिंदू ?*

- ‘कोःहं ?’ या प्रश्नापासून ‘तत्वमसि’ आणि ‘अहं ब्रम्हास्मि’ या उत्तरांपर्यंतचा प्रवास उपनिषदांच्या काळातच पूर्ण करणारे आपण हिंदू आहोत.
- ‘चार आर्यसत्यांद्वारे’ मानवी जीवनाच्या दु:खाचे संपूर्ण वैज्ञानिक विश्लेषण करून ‘अप्प दीपो भव:’ हा मार्ग सांगणार्‍या भगवान गौतम बुद्धाची वाट अनुसरणारे आपण हिंदू आहोत.
- जगातल्या सर्वात मोठ्या अशा ‘णमोकार’ मंत्राचे उच्चारण करणारे आपण हिंदू आहोत.
- गुरु नानक देव यांच्या ‘एक ओंकार सतनाम’ या मूलमंत्राचे पठण करणारे आपण हिंदू आहोत.
- सकल प्राणिमात्रांसह चराचर सृष्टीचे ‘अंतिम गंतव्य’ एकच असून तिथपर्यंत पोहोचण्याचे ‘मार्ग भिन्न-भिन्न’ आहेत हे तत्व मान्य करणारे आपण हिंदू आहोत.

- *‘सर्वसमावेशकता हे पूर्णपणे अनोखे तत्वज्ञान जन्मजातच रक्तात भिनलेले आपण हिंदू आहोत. ‘कुठल्याही विरुद्ध मताचा स्वीकार करणे/ आदर राखणे’ हे हिंदू म्हणून आपले संपूर्ण पृथ्वीतलावर एकमेवाद्वितीय असे वैशिष्ठ्य आहे.* या विशिष्ट तत्वामुळेच कुठल्याही नव्या किंवा क्रांतिकारी विचाराचा सहज स्वीकार करणारे लोकसुद्धा हिंदूच असल्याचे दिसून येते. या अनोख्या वैशिष्ट्यामुळे अगदी विरुद्ध मतांचा पुरस्कार करणार्‍यांमध्येही हिंदूच आघाडीवर दिसतात. अगदी ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या एकूण संख्येमधे हिंदू धर्मीय कार्यकर्त्यांची संख्या एवढी प्रचंड दिसते ती सुद्धा यामुळेच. ही संख्या जास्त दिसण्याचा संबंध हिंदूंच्या लोकसंख्येच्या प्रमाणाशी फार अधिक नसून त्यांच्या खुल्या मानसिकतेशी जास्त आहे. 

शेवटी डॉ. दाभोलकरांनी आपल्या विश्लेषणात म्हटल्याप्रमाणे ‘'हिंदू कार्यकर्त्यांनी मुसलमानांच्या अंधश्रध्दांबद्दल बोलणे ही बाब मुसलमानांना रुचत नाही." हे ही खरेच. कारण ‘सर्वसमावेशकता’ हे अनोखे तत्वज्ञान हिंदू सोडून इतर कुठल्याही धर्माकडे नाही. तसेच तिथे, इतरांच्या मतांचे ‘खंडण-मंडन’ करण्याची परंपराही अस्तीत्वात नसून सरळसोट तलवारींची भाषा आहे. त्यामुळेच, ‘आपापल्या धर्माच्या ईश्वरी मान्यतांवर बाळबोध आघात करत आपल्या धर्मात निर्माण झालेल्या अंधश्रद्धांचे निर्मूलन करण्याची प्रेरणा’ हिंदू नसणार्‍या इतर धर्मीय व्यक्तीच्या मनात एकतर जन्म घेत नसावी किंवा घेतली तरी ती राबवण्यासाठी त्या व्यक्तीची हिम्मत होत नसावी.

थोडक्यात सांगायचे तर ‘अंनिस’मधे असणार्‍या माझ्या बांधवांनो, ‘तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली फक्त आणि फक्त हिंदू धर्माला बडवण्याचाच ढोंगीपणा यापुढेही असाच करत रहाणार आहात. इतर धर्मातील अंधश्रध्दांवर तुम्ही ठेवलेले बोट कायमच ताटातल्या चिमूटभर मिठापुरते म्हणजे फक्त दाखवण्यापुरते मर्यादित रहाणार आहे. कारण, तुम्हाला इतर धर्मीय कार्यकर्ते हव्या तेवढ्या प्रमाणात मिळणारही नाहीत आणि इतर धर्मांतील अंधश्रद्धांवर इतके सलग प्रहार करण्याची तुमची हिम्मतही कधीच होणार नाही.’

परंतू
*‘आपण जे काही करतो आहोत त्यालाच फक्त विवेक म्हटले जाते अशी तुमचीही अंधश्रद्धाच आहे’* एवढे मात्र निश्चित.

तसेच,
बहुधर्मीय भारतात ‘सतत हिंदूंच्या अंधश्रद्धांवर बोट ठेवून आपण फार मोठी समाजसुधारणा घडवून आणत आहोत’ हा ही तुमचा गैरसमजच म्हणायचा.

असो.
या लेखात, *अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कार्यात सहभागी असलेल्यांमधे हिंदू कार्यकर्त्यांची संख्या मोठी असण्याचे कारण, लोकसंख्येच्या बहुलतेशी जोडणे म्हणजे निव्वळ गैरसमज असल्याचे व हिंदू कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येचे कारण हिंदूंच्या खुल्या मानसिकतेशी निगडित असल्याचे आपण पाहिले.*

*अंतस्थ जाणीवांची एकसमान आस्था असणार्‍या भारतीयांचा स्वभाव* आपण ‘नाण्याची एक बाजू’ या पुढच्या लेखात समजून घेण्याचा प्रयत्न करूया व त्यानंतर ‘भारतासमोरील वर्तमानाचे सर्वात मोठे आव्हान’ काय आहे यावर चर्चा करूया.

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.